अर्थक्रांती लवकरच निवडणुकीतील महत्त्वाचा मुद्दा : बोकील

 Divya Marathi Special >> Interview Of Anil Bokil
यमाजी मालकर|Jan 18, 2014, 07:50AM IST
सर्व भारतीय ज्या अनेक किचकट करांच्या ओझ्याखाली दबले आहेत, ज्या काळ्या पैशांच्या मुळाशी आजची करपद्धती आहे, तीत आमूलाग्र बदल होईल काय?, सर्व कर रद्द होऊन देशात खरोखरच बँक ट्रान्झेक्शन टॅक्स (बीटीटी) सारखा सुटसुटीत आणि काळा पैसा निर्माणच होणार नाही, असा कर येणार काय, अशी उलटसुलट चर्चा देशात सर्वत्र सुरू झाली आहे. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आणि योगगुरू बाबा रामदेव यांनी ही चर्चा ज्या अर्थक्रांती प्रतिष्ठानच्या प्रस्तावावरून सुरू केली आहे, ते प्रतिष्ठान महाराष्ट्रातील. मूळ लातूर, नंतर औरंगाबाद आणि आता पुण्यात राहत असलेले अनिल बोकील हे त्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष. त्यांची ही खास मुलाखत.
प्रश्न – अर्थक्रांतीचा प्रस्ताव स्वीकारण्याशिवाय या देशाला पर्याय नाही, असे आपण गेली 13 वर्षे म्हणत आहोत. या परिस्थितीत अर्थक्रांतीची चर्चा राष्ट्रीय पातळीवर पोहोचली ही आनंदाची गोष्ट आहे. पण हे घडले कसे?
अनिल बोकील – हे घडणारच होते. अर्थव्यवस्था आणि पर्यायाने समाजजीवन या थराला खालावले आहे की आता ऑपरेशनशिवाय पर्याय नाही, हे सर्वांनाच कळून चुकले आहे. त्याची कबुली देऊन त्यावर उपचार   करण्याची हिंमत कोण करतो, एवढाच प्रश्न होता. पैसा किंवा चलन हे विनिमयाचे साधन आहे, ती साठवण्याची वस्तू नाही, हे मूलभूत तत्त्व आपण मोडले आणि देश गंभीर आजारी पडला, याला तर पुराव्याची गरज राहिलेली नाही. त्याला आता एका ऑपरेशनची गरज आहे, एवढेच अर्थक्रांतीचे पाच प्रस्ताव सांगतात. अर्थक्रांतीची देशभर आजपर्यंत अडीच हजार सादरीकरणे झाली आहेत. त्यातून हा विषय देशात सुप्त स्वरूपात चर्चिला जात होताच. त्याला आता राजकीय जोड मिळाली. तेरा वर्षांच्या प्रवासात लाखो संवेदनशील नागरिकांनी या प्रस्तावांना साद दिली, त्याचाच हा परिणाम आहे. आज उलटसुलट चर्चा होत असली तरी अर्थक्रांती हा या देशात एक दिवस निवडणुकीतील प्रचाराचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा होईल, असा प्रतिष्ठानला विश्वास वाटतो.
प्रश्न – बँक ट्रान्झेक्शन टॅक्स (बीटीटी) ची चर्चा सुरू झाली आणि त्याविषयी अनेक आक्षेपही घेतले जात आहेत, त्या आक्षेपांविषयी आपण काय सांगू शकाल?
अनिल बोकील  - एक बाब समजून घेतली पाहिजे की, अर्थक्रांतीचे पाच प्रस्ताव आहेत. ते प्रतिष्ठानने कॉपीराइट करून ठेवले आहेत. उद्देश हा की, त्याची मोडतोड होऊ नये. पण अनेक जण, ज्यात तज्ज्ञही आहेत, जे फक्त  बीटीटीविषयीच बोलतात. खरे तर प्रस्ताव सीमाशुल्क सोडून इतर सर्व कर रद्द करण्याविषयी बोलतात, 50 पेक्षा अधिक मूल्याच्या नोटा व्यवहारातून काढून टाकण्याविषयी तसेच रोखीचे व्यवहार विशिष्ट मर्यादेत करण्याविषयीही बोलतात. पण पाच प्रस्ताव अजून सर्वांपर्यंत पोहोचले नसल्याने या प्रतिक्रिया किंवा आक्षेप आहेत, हे लक्षात घेतले पाहिजे. आमच्या वेबसाइटवर (www.arthakranti.org ) अशा आक्षेपांना आम्ही मुद्देसूद उत्तरे दिली आहेत. ही उत्तरे तर आम्ही गेली 13 वर्षे देत आहोत. आक्षेप घेणा-यांनी ते समजून घेतले की त्यांचे आक्षेप गळून पडतील. टीव्हीवरील चर्चांना पुरेसा वेळ मिळत नसल्याने काहींचे गैरसमज होत आहेत. त्यांनी वेबसाइट पाहावी किंवा विषय समजून घ्यावा, असे आवाहन मी करतो.
प्रश्न – भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यासमोर आपण तीन महिन्यांपूर्वी सादरीकरण केले होते. त्या वेळी त्यांचा प्रतिसाद कसा होता?
अनिल बोकील – देशाचे नेतृत्व केलेल्या आणि करू शकणा-या बहुतांश नेत्यांना आम्ही हे सादरीकरण दिले आहे. नरेंद्र मोदी यांच्यासमोर अहमदाबादेत त्याच मालिकेत आम्ही सादरीकरण केले. मोदी यांनी ८0 मिनिटे ते शांतपणे ऐकून घेतले. त्यानंतर त्यांनी अर्थतज्ज्ञांचा सल्ला घेतला असेल. मात्र, नंतर लगेच भाजपच्या प्रमुख नेत्यांसमोर दिल्लीत सादरीकरण झाले. एक-दोन नेते वगळता सर्वांचे त्यातून समाधान झाले आणि त्यानंतर नितीन गडकरी आणि डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी हे प्रस्ताव भाजपच्या व्हिजन डॉक्युमेंटचा भाग करण्याचा विचार सुरू असल्याचे सूतोवाच केले. रामदेवबाबा यांनीही त्यासाठी प्रयत्न केले. खरे सांगायचे तर या प्रक्रियेपेक्षा मला ते मुद्दे देशासमोर आले हे अधिक महत्त्वाचे वाटते. आता त्याच्यावर व्यापक चर्चा सुरू आहे आणि ती झालीच पाहिजे. कारण तो आपल्या देशाची व्यवस्था बदलण्याचा विषय आहे. आपण नेहमी व्यवस्था बदलली पाहिजे, असे म्हणतो. मला वाटते तो बदल म्हणजे अर्थक्रांती.
प्रश्न – बँक ट्रान्झेक्शन टॅक्स (बीटीटी) मधून पुरेसा महसूल मिळणार नाही आणि लोक बँकेच्या बाहेरच व्यवहार करतील, असे मुख्य आक्षेप आहेत. त्याला आपले काय उत्तर आहे?
अनिल बोकील – एमकेसीएलच्या मदतीने आम्ही यावर एक रिपोर्ट तयार केला आहे. त्यात सगळी आकडेवारी दिली आहे. आपल्याला काय वाटते यापेक्षा अर्थशास्त्रात आकडेवारी महत्त्वाची. सध्या सगळे कर मिळून सरकारला साधारण 15 लाख कोटी रुपये मिळतात. बीटीटीच्या माध्यमातून 2 टक्के कर लावला, तर 40 लाख कोटी रुपये जमा होतील. त्यातून सरकार किती सक्षम होईल याची कल्पना करून पाहा. आम्ही तर राजकारणाला पांढरा पैसा देण्याचीही योजना त्यात केली आहे. 50 पेक्षा जास्त मूल्याच्या नोटा नसताना आणि करांचा त्रास नसताना लोक बँकेचे व्यवहार करणार नाहीत, असे आम्हाला अजिबात वाटत नाही. झाले असे की, करांच्या भीतीपोटी आपली एक मानसिकता तयार झाली आहे. काही चांगले होऊ शकते, यावरील आपला विश्वास कमी झाला आहे. मुळात भारतीय समाज प्रामाणिक आयुष्य जगू इच्छितो, पण त्याची व्यवस्थेने कोंडी केली आहे, हे आपण समजून घेतले पाहिजे. आणि अगदीच कोणाचे काही गंभीर आक्षेप असतील तर आम्ही त्यांचे निराकरण करण्यास तयार आहोत. प्रस्तावात अर्थशास्त्रीय चूक काढून त्यास परिपूर्ण, बिनचूक करण्याचे आम्ही स्वागतच करू. अट एकच आहे की, प्रस्ताव पाच आहेत आणि ते सर्व सारखेच महत्त्वाचे आहेत.
प्रश्न – अर्थक्रांती प्रस्तावांची अंमलबजावणी भारतात झाली तर देशाची आजची परिस्थिती आमूलाग्र बदलून जाईल, असे आपण म्हणता, हे थोडे स्पष्ट करा.
अनिल बोकील – आजच्या बहुतांश नकारांचे होकारांत रूपांतर होईल, हे त्याचे थोडक्यात उत्तर. मात्र, अधिक खुलासा करायचा तर या देशाला एफडीआयची गरजच पडणार नाही. आजची महागाई एकदम म्हणजे 30 ते 50 टक्क्यांनी कमी होईल. अधिक कर जमा होईल, करदातेही वाढतील, मात्र कर देण्याचा त्रास जाणवणार नाही. सार्वजनिक सुविधा आणि पायाभूत सुविधांसाठी भांडवल कमी पडणार नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे काळा पैसा निर्माणच होणार नाही. अधिकाधिक पैसा बँकेत म्हणजे समाजाच्या मालकीचा झाल्यामुळे व्याजदर कमी होतील. व्यवहार पारदर्र्शी होतील. सरकार सक्षम होईल म्हणजे प्रशासन निरपेक्ष आणि सशक्त होईल. अतिरेकी गट काळ्या पैशांवर पोसले जातात, त्यांच्या कारवाया थांबतील. बनावट   नोटा कशा रोखायच्या, हा प्रश्न संपेल. आज गरीब नागरिक अप्रत्यक्ष करांमुळे क्रयशक्ती हरवून बसले आहेत, त्यांच्या अनेक गरजा भागत नाहीत. त्यांची क्रयशक्ती वाढून अर्थव्यवस्थेला गती प्राप्त होईल. अशा नागरिकांची संख्या आज ६0 कोटी आहे, हे लक्षात घ्या. करचुकवेगिरी आणि करवसुलीसाठीचा आजचा प्रचंड खर्च राहणार नाही. त्यामुळे आजच्या  मॅन्युप्युलेशनऐवजी देश इनोव्हेशनला महत्त्व देऊ शकेल. विषमता कमी होईल. संधीचे निर्माण इतके होईल की, संधीअभावी आम्ही आमच्यात जे कलह वाढवून ठेवले आहेत ते संपतील आणि एकसंघ, स्वाभिमानी भारताचा मार्ग मोकळा होईल.
प्रश्न – अर्थक्रांती प्रस्ताव देशासमोर एक अजेंडा म्हणून येण्यासाठी भविष्यात काय योजना आहेत ?
अनिल बोकील – या देशाला अर्थक्रांती प्रस्तावांची गरज आहे आणि तो निर्णय राजकीय इच्छाशक्तीवर अवलंबून आहे. त्यामुळे देशातल्या राजकीय नेत्यांनी या मूलभूत बदलाविषयी बोलायला सुरुवात केली पाहिजे. ही पहिली गरज होती. तिची सुरुवात आता झाली आहे. पण राजकीय पक्ष आणि नेते जनतेच्या रेट्याशिवाय बदल करत नाहीत. त्यामुळे तो रेटा आर्थिक साक्षरतेच्या मार्गाने निर्माण करत राहणे, हे काम सुरूच राहणार आहे. वेबसाइट, प्रकाशने, सादरीकरणे, व्याख्याने, चित्रपट, सुजन व्होट बँक आणि समर्पण यात्रेसारखे उपक्रम सुरूच ठेवावे लागणार आहेत. भारतासारखा खंडप्राय देश एका चांगल्या व्यवस्थेनेच एकात्म होऊ शकतो. त्यामुळे या ऑपरेशनशिवाय पर्याय नाही, असे अर्थक्रांती प्रतिष्ठानला ठामपणे वाटते आणि त्यासाठी हा निवडणुकीतील एक महत्त्वाचा मुद्दा होईल, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.

One thought on “अर्थक्रांती लवकरच निवडणुकीतील महत्त्वाचा मुद्दा : बोकील”

  1. Even the smaller currency denominations of 1to50, the currency notes shall have issue year and expiration year printed on it. Say maximum of 3 years. All ATM shall issue only fresh currency notes released from RBI maximum of 3000 per person per month on strict KYC -AADHAR verification. There shall be a dedicated counter in bank to take back near expiring/ Expired notes (say 3 months before and three months after expiry ) and issue 1 year expiry balance notes linked to bank accounts. This will do away hoarding of currency even in small denominations. Poor man cannot have capacity to store 3k per month cash for longer than 3 years.
    E-Transactions does not have these restrictions.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


four × 8 =

You may use these HTML tags and attributes: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <strike> <strong>